आरती करू करू दीनदयाळा ।
अति अनसूयेच्या बाळा ॥धृ॥
धरि अवतार अवतार हृषीकेशी, आले ब्रह्मकर्माशी ।
अनसूये करी करी करांजुळीसी, जगी दत्तात्रेयासी आनंद झाला ॥चाल॥
त्रिभुवनी आनंद झाला पाताळी पाताळाला, दुंदुभी आकाशाला ।
सुरवर वर्षती सुमनाला, मिळोनिया वंदिती वंदिती ओवाळा ।
स्वामी चला सह्याचळा ॥१॥
तेथून आले वरदानी, सहस्त्राजुर्ना दे पाणी ।
अळंकाचे हरले ताप तिन्ही, गोरक्षाशी बोधूनी रुचिक ऋषी ॥चाल॥
तेथ आले रुचिक ऋषी, शामकर्ण देऊनी घाशी ।
खेळ क्रीडा पारध वेषी, आली जीवाची जीवाची कनवाळा ।
नेवोन ठेवी सुखफळा ॥२॥
मग स्थापिली स्थापिली रेणुका, जेथे होती कोरी भूमिका ।
परशुराम राम पुत्र ऐका, बाण मारोनी काढी उदका ।
पाजी पाणी ॥चाल॥
पाजी रेणुकेला पाणी, दिले सरणाशी लावूनी ।
आपण जाय तेथोनी, निघे देवी दहनातूनी ।
फिरूनिया पाहे पाहे राम डोळा, तयासी राहे मुडगोळा ॥३॥
चरणचारी चारी पर्वत, सत्व कोसाची गणित ।
अवलोकिता सर्व पाप जळत, आले विघ्न दूर पळत ।
पहा अवतार ॥चाल॥
चहुयुगी तो अवतार ।
परब्रह्म परात्पर ध्याती ।
शक्र सुरवर ऋषिमुनि योगीश्वर ।
आदिकारण कारण गुरूकुळा ।
अमोघ दर्शन तुझी लीळा ॥४॥
तेथून आले आले पर्यंता, देवल ऋषि करिता ।
गर्वे बोले बोले ऋषि अहंता, मजहून नाही कोणी परता ।
दिगंबर ॥चाल॥
तेथे आले दिगंबर, केले ऋषिला उत्तर ।
आम्ही वाहू बेलपत्र, हात ठेवूनी पिंडीवर ।
नेऊनिया घाली घाली पाताळा ।
देवल विनवी घननीळा ॥५॥
दत्त शिखराशी शिखराशी नित्य खेळ, भेटी दोही देवाजवळ ।
वन पाठारी पाठारी नित्य खेळ, वनदेव विनवी विशाळ ।
करी भोजन ॥चाल॥
करी भोजनती भोजन, पंच देऊळी लपन ।
आवळी तळी आसन, देव देवेश्वरी निद्रा ।
शयन दोही ओट्यावर ओट्यावर न्याहाळा ।
तेथूनी तीर्थ झाले सोळा ॥६॥
नित्य उठोनी उठोनी अटन, भागीरथीचे करी स्नान ।
बद्रिकेशी केशी पुराण श्रवण, कोल्हापुरी भिक्षा जाण ।
करी पांचाळे ॥चाल॥
करी पांचाळेश्वरी बीजे, नित्य सह्याचळी निजे ।
गुरू दैवत मुकुंदराज, आजि दत्तात्रेय महाराज ।
ठेवूनी मी जातो तुमच्या पदकमळा ।
वाकु सेवक सर्भाळा ॥७॥