प्रार्थना – कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा
कनवाळा मोक्षदायी वेल्हाळा तुजसी बा नमीतो ।
नमीतो बा तुजसी माझे बाबा खचीतची हा दास ।
दास हा खचीतची पापी महा निष्ठुर मतीमंद ।
मंद मती निष्ठुर मज सम जगती जीव ना कोणी ।
कोणी ना जीव उद्धारक भुवना मजसी तुजविणा ।
तुजविणा मजसी नाही राणा नित्यही प्राणसखा ।
प्राणसखा नित्यही पाठीराखा दयाब्धी परमेशा ।
परमेशा दयाब्धी तु अविनाशा सच्चिदानंदा ।
आनंदा सत् चित् मिळोनी कंदा शोधे त्रय अंशी ।
त्रय अंशी शोधे ईश्वर तुजसी नाम या सृष्टी ।
सृष्टी या नाम धरोनी राया व्यक्त झालासी ।
झालासी व्यक्त स्वयं स्वरुपासी जीवा कारण ।
कारण जीवा द्यावया दान आनंद आपुला ।
आपुला आनंद मज गरिबाला हीच तृष्णाही ।
तृष्णा ही हीच एकली पाही प्रेमदासाची ।
दासाची प्रेमही तृष्णा साची मोक्ष कनवाळा ।
कनवाळा मोक्ष दायी वेल्हाळा तुजसी वा नमीतो ।