मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

पंचावतार नमन

आरती · तुझ्या मंदिरी आलो मी देवा

तुझ्या मंदिरी आलो मी देवा ।
पूजन तुझे करावयाला ॥धृ.॥

अनाथ भक्त मी तुझा सानुला ।
मज जवळी ना धन कण आजला ।
भावही नाही भक्तीही नाही ।
श्रद्धा ही नाही अढळ मनाला ॥१॥

कुंकुम तिलक नाही अक्षता ।
फल, फूल नाही हे भगवंता ।
धूप ही नाही दीपही नाही ।
नैवेद्य नाही सुपुष्पमाला ॥२॥

प्रगट कराया हृदय भावना ।
चतुरपणा तो मुळी मजला ना ।
अंतरी काही सुबुद्धी नाही ।
औदार्य नाही किमीप मजला ॥३॥

अभागी निर्धन अबुद्ध दोषी ।
काहीच नाही प्रभू मजपासी ।
रिक्त हे तन मन करुनी समर्पण ।
सहर्ष पुजीतो मी आज तुजला ॥४॥

असे हे पूजन अपूर्ण सेवा ।
तू मान अथवा न मान देवा ।
दास दामोदर तुला निरंतर ।
विनम्र प्रार्थितसे दयाळा ॥५॥