नाम स्मरा तुम्ही ईश्वराचे ।
सार्थक होईल जीवनाचे ॥धृ.॥
उठूनिया प्रातःकाळा । घेऊनिया हाती माळा ।
चिंतन करा हो सर्वज्ञांचे । सार्थक होईल जीवनाचे ॥१॥
नाम मुखे उच्चारिता । दूर होती सर्व व्यथा ।
नासती डोंगर महापापाचे । सार्थक होईल जीवनाचे ॥२॥
ईश नामी थोर शक्ती । नानाविधे विघ्ने हरती ।
लाभे सदा सुख शांती साचे । सार्थक होईल जीवनाचे ॥३॥
महिमा अगाध या नामाचा । बंध फिटे अविवेकाचा ।
धाम मिळे मग कैवल्याचे । सार्थक होईल जीवनाचे ॥४॥
येता जाता उठता बसता । ग्रास घैता निद्रा करीता ।
घ्यावे प्रभू नाम सदा वाचे । सार्थक होईल जीवनाचे ॥५॥