आता हो स्वामी सुखे निद्रा करावी अवधूता, स्वामी करावी भगवंत
चिन्मय पर सुखधामा जाऊनी पहुडावे त्वरिता ।।धृ।।
वैश्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला
तया वरूते सुप्रेमाचा शिडकावा दिधला ।।१।।
पायघड्या घातल्या स्वामी नवविधा भक्ती
ज्ञानाच्या समया उजळूनी लाविल्या ज्योती ।।२।।
भावार्थाचा मंचक हृदयी आकाशी टांगला
मनाची सुमने तोडूनी केले शेजेला ।।३।।
आशा, मनाशा दुष्ट कल्पना सांडूनीया सकळा
दया, क्षमा, शांती, दासी उभ्या सेवेला ।।४।।
अद्वैताचे कपाट सांडूनी स्वतंत्र केले
दुर्बुद्धीच्या गाठी फेडूनी पडदे सोडीले ।।५।।
अलक्ष लक्ष उन्मय घेऊनी नाजूक दुशाला
निर्गुणवासी सगुणविलासी शेजे पहुडला ।।६।।