मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

स्नानाची आरती

आरती · तुला स्नान घालितो मी

 

तुला स्नान घालितो मी चक्रधरराया ।

चक्रधरराया देवा, माल्हनीच्या तनया ।।धु।।

आरंभी तुला मी गंध लावुनिया ।

प्रार्थना करितो नम्र होऊनिया ।

भक्ती भावनेने तुझे गुण गाऊनिया ।।१।।

दही दूध साखर आणि मधुपर्क संग ।

सुगंधित उटण्याने मर्दितसे अंग ।

शीत उष्ण निर्मल पाणी वरी घालुनिया ।।२।।

सुवासिक चंदनाची उटी उगाळुनी ।

अत्तरे सुगंधीत ही त्यात मेळवुनी ।

हळुवार देवा तुझ्या अंगी लावुनिया ।।३।।

टिळा केशराचा भाळी लावुनिया ।

हार सुमनाचा गळा घालुनिया ।

फळे पान नारळ ऐसा विडा वाहुनिया ।।४।।

धूप दीप मंगल आरती तुला ओवाळुनी ।

गातो स्तुती स्तोत्रे दामोदर मुनी ।

आवागमन चुकवी माझे कृपा करूनिया ।।५।।