उठा उठा श्रीचक्रधर राया। भक्त वाट पाहाती ।
पदरी घेउनि पवित्र करुनि भक्ती देइजो जी ।।धृ।।
धरणी आसशील स्पर्श व्हावया आपुल्या श्रीचरणाचा ।
विरहाग्नीने तप्त जाहली शीतल किजो जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया... ।। १ ।।
प्राण उतटुनि कंठा आणी आर्त नाही तैसी ।
औदार्याचा सिंधु माझा प्रेम देइजो जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया... ।। २ ।।
प्रातःकाळी प्रभुजी उठले कृपादृष्टी वळली ।
तळमळ करिते भक्त तारिले तैसे तारिजो जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया ..।। ३ ।।
अनंत सृष्टी हिंडत आलो बहु श्रम आला जी ।
कठिण कोरडा कधी मी तुमच्या पदरी पडेन जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया ... ।। ४ ।।
अनंत वेळा प्रमाद जोडुनि खंती आणिली जी ।
ऐसा मी अपराधी कैसा योग्य होईन जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया ...।। ५ ।।
अनिमित्त बंधु महादानी तू औदार्य रावो ।
पाहू नका तुम्ही अपात्रता ही वरदान देइजो जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया ... ।। ६ ।।
कवीने आपुले सुगंधहीन हे पुष्प वाहिले जी ।
सुगंधहीन ते सुगंधी करुनि श्रीकरी घेइजो जी ।
उठा उठा श्रीचक्रधर राया ... ।। ७ ।।